डिजिटल पेमेंट करण्यासाठी मोबाईल अॅप तयार करा

मुंबई (प्रतिनिधी) : - डिजिटल पेमेंट करण्यासाठी सर्व बँकांना वापरता येईल असे र्सवकष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यामध्ये जिल्हा सहकारी, प्रादेशिक बँकांचा समावेश करावा. जेणेकरून ग्रामीण भागातही त्याचा वापर प्रभावीपणे करता येणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. नीती आयोगाच्या अंतर्गत डिजिटल पेमेंटचा दैनदिन जीवनात वापर वाढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत बुधवारी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीमध्ये समितीचे नियंत्रक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डिजिटल सल्लागार नंदन निलेकणी आणि इतर तज्ज्ञ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. येत्या तीन महिन्यांत दहा लाख पीओएस मशीन वितरित करण्यात येतील. त्यामुळे कॅशलेस व्यवहार करण्यास चालना मिळणार आहे. तेव्हा सर्व बँकांना या माध्यमातून डिजिटल पेमेंट करता यावे म्हणून र्सवकष मोबाईल अॅप विकसित करणे, आधारकार्डचा वापर करून चलनविरहित व्यवहार करणे अशा विविध मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.